सर्वपक्षीय बैठकीतील अनुपस्थितीवरुन मोदी यांच्यावर टीका   

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. त्यावरुन, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, भाजपकडून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.
 
संकटाच्या काळात सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे. परंतु, भाजपला विष पसरवून लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असा आरोप खर्गे यांनी यावेळी केला.सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. परंतु, पंतप्रधान उपस्थित नव्हते. ते बिहारमध्ये आगामी निवडणुकीचे भाषण देत होते. हे खूपच खेदजनक आहे, असेही खर्गे म्हणाले.
 
’संविधान बचाओ’ कार्यक्रमात खर्गे म्हणाले, आमच्यासाठी देश सर्वोच्च आहे. त्यामुळे, काँग्रेसने सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी देश सर्वोच्च आहे. देशासाठी प्रत्येकाने एकत्र आले पाहिजे, असेही खर्गे म्हणाले.काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि लाखो लोकांनी आपले रक्त सांडले. आपले जीवन स्वातंत्र्यासाठी समर्पित केले, असेही ते यावेळी म्हणाले.
 
पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत पहलगाम हल्ल्याबाबतची माहिती द्यायला हवी होती. सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, कोणती योजना आखली जात आहे, हे सांगायला हवे होते. विरोधकांकडून कशाप्रकारचे सहकार्य आणि मदत हवी होती, ते सांगायला पाहिजे होते, असेही खर्गे म्हणाले.
 

Related Articles